पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत आई, भाऊ, पत्नी, पुत्र, पुतण्या यांना उभे केल्याने पुणे शहरातील राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर याचबरोबर माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार विनायक निम्हण, बापूसाहेब पठारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़ प्रभाग क्रमांक १४ मॉडेल कॉलनी, डेक्कन जिमखानामधून तीन विद्यमान नगरसेवकांविरोधात खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे हे लढत देत आहे़ आपल्या मुलासाठी खासदार अनिल शिरोळे गेल्या काही दिवसांपासून प्रचारावर लक्ष ठेवून होते़ मंगळवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्यांनी स्वत: विविध मतदान केंद्रांवर स्वत: जातीने फेरफटका मारून मतदानाची माहिती घेतली़ याशिवाय प्रचारात व्यूहरचना करण्यातही त्यांनी स्वत: लक्ष घातले होते़ चार मातब्बर उमेदवारांमध्ये होणारी लढत चुरशीची झाली असून, आपल्या पुत्राला निवडून आणण्यात खासदार शिरोळे यांना यश येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानंतर, त्यांनी भाजपाची उमेदवारी घेतली; पण उच्च न्यायालयाने त्यांची भाजपाची उमेदवारी रद्द केल्याने शेवटी भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या प्रभाग ७ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ -वाकडेवाडीमधून विद्यमान नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष यांच्याशी जोरदार लढत देत आहे़ आमदार अनिल भोसले हे स्वत: पडद्यामागे राहून निवडणुकीची सर्व सूत्रे हलवत होते़ सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ आणि विद्यमान नगरसेवक सुनील कांबळे हे प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड -लोअर इंदिरानगरमधून निवडणूक लढवत आहेत़ आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे अभिषेक तापकीर हे प्रभाग ३९ धनकवडी, आंबेगाव पठारमधून निवडणूक लढवत आहेत़ आमदार जगदीश मुळीक यांचा भाऊ आणि विद्यमान नगरसेवक योगेश मुळीक हे प्रभाग क्रमांक ५ वडगाव शेरीमधून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत़ माजी मंत्री आणि शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश कासेवाडीतून लढत आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे पुत्र सनी बाणेर-बालेवाडी प्रभागातून लढत आहेत. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पत्नी संजिला पठारे, पुतण्या नगरसेवक महेंद्र पठारे निवडणुकीत लढत आहेत. त्यांचा भाचा संतोष भरणे शिवसेनेकडून विरोधात लढत आहे.
मंत्री, खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Updated: February 23, 2017 03:44 IST