पुणे: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे रखडलेली इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये येत आहेत.त्यामुळे सुमारे आठ महिन्यानंतर महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजू लागली आहेत.परंतु,प्रवेशाची तिसरी व विशेष फेरी संपल्यानंतरच विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत.
कोरोनामुळे व मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील इयत्ता अकरावी ॲानलाईन प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. परंतु, पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. दुस-या फेरीतून 23 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यामुळे विद्यार्थी फर्ग्युसन,स.प.महाविद्यालय,मॉडर्न महाविद्यालय आदी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करून घेत आहेत. काही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी व पालकांना नोंदणी करून आणि थर्मल स्कॅनने तपासणी करून पाठविले जात आहे.
महाविद्यालये बंद असली तरी विद्यार्थ्यांना सह्याद्री वाहिनीवरून ॲानलाईन मार्गदर्शन केले जात आहे. राज्य शासनाने नववी ते बारावी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, प्रवेशच न झाल्यामुळे अद्याप महाविद्यालयांकडून प्रत्यक्ष वर्ग सुरू केले नाहीत.अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिक्षण घेण्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.