लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी मंडईत सुरू असलेल्या खोदकामात सापडलेले अवशेष प्राण्यांचे असून ते १०० ते १५० वर्षांपूर्वीचे असावेत, असा अंदाज डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील पुराजैव संशोधक डॉ. पंकज गोयल यांनी सांगितले. काही अवशेष हत्तीचे असावेत, इतर अवशेषांची पाहणी केल्यानंतर त्याबद्दल अधिक सांगता येईल, असे ते म्हणाले.
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. मंडईत या मार्गाचे भुयारी स्थानक आहे. तिथे सुरू असलेल्या खोदकामात बुधवारी १० फूट खोलीवर कामगारांना काही हाडे सापडली. त्यातील काही हाडे मोठी होती.
डॉ. गोयल यांनी सांगितले की, हे अवशेष प्राचीन वगैरे नाहीत. साधारण शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीचे असावेत. काही हाडे हत्तीची आहेत, हे लगेच लक्षात येते. दुसरी काही लहान हाडे आहेत, त्याची अधिक तपासणी करावी लागेल. दरम्यान, खोदकामात सापडलेली हाडे पुणे मेट्रोने अभ्यासासाठी संशोधकांकडे सुपूर्द करण्याचे ठरवले आहे.