गराडे : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुरंदर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जो निधी लागेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे विकासाची कामे कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीत, असे प्रतिपादन माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
गराडे (ता. पुरंदर) येथे गराडे, सोमुर्डी, भिवरी, थापे-वारवडी या ग्रामपंचायतींतील नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवतारे बोलत होते.
या वेळी पुरंदर पं. समिती माजी सभापती अतुल म्हस्के, माजी उपसभापती दत्ताशेठ काळे, उद्योजक राजेंद्र झेंडे, राजेंद्र काळे, विजय ढोणे, संदीप कटके, दिलीप कटके, नीलेश जगदाळे,रोहित खवले, संजय जगदाळे, बाळासाहेब दुरकर , शिवाजी जगदाळे, सुरेश जगदाळे बाळासाहेब रावडे,संजय रावडे,बाळासाहेब यादव उपस्थित होते.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य समीर तरवडे, स्वप्नाली जगदाळे, सुजाता कुंभार, नवनाथ गायकवाड, गीतांजली ढोणे, ललिता जगदाळे, नितीन जगदाळे, सुप्रिया रावडे, अजित दुरकर, अनिता जगदाळे व हरिश्चंद्र वाडकर यांचा गावच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाबाराजे जाधवराव म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक राजकीय कार्यकर्ते घडत असतात. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतमधून कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी निर्माण होत असते. त्याच दृष्टिकोनातून गराडे गावचे सुपुत्र गंगाराम जगदाळे हेदेखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढे आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी देखील आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, ती विश्वासपूर्वक पार पाडावी.
या वेळी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव जगदाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य व कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजय गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन योगेश जगदाळे यांनी केले.
विमानतळ पुरंदरमध्येच व्हायला हवे...
विमानतळासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढील दिशा ठरवली पाहिजे व विमानतळ हे पुरंदरमध्येच झाले पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या संधी पुरंदरमध्ये उपलब्ध होतील. विमानतळ जर पुढे पंधरा किलोमीटर हलवले तर त्याचा फायदा बारामतीला होईल. त्यामुळे विमानतळ हे पारगाव वगळता त्याच ठिकाणी करण्यात यावे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.
२८ गराडे
नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित असलेले विजय शिवतारे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे व इतर.