पुणे : तक्रारदाराला कागदपत्रे आणि सदनिकेचा ताबा देण्याचा ग्राहक न्याय मंचाच्या आदेशाला तब्बल सहा वर्षे उलटले तरी त्याचे पालन न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला तुरुंगवारी करावी लागणार आहे. ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य मोहन पाटणकर यांनी या बांधकाम व्यावसायिकाला आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी तीन महिन्यांची कैद व ५ हजार रुपयांचा दंड सुनावला. या प्रकरणी संभाजी व्यंकट पाटील (रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता) यांनी भरत आनंदराव बरकडे या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध तक्रार दिली होती. बरकडे यांची सदाशिव पेठेत प्रेमदास कन्स्ट्रक्शन्स नावाची बांधकाम व्यावसायिक संस्था आहे. पाटील यांनी बरकडे यांच्या एका गृहप्रकल्पात सदनिका घेतली होती. मात्र, रक्कम घेऊनही त्यांना कागदपत्रे मिळाली नव्हती. त्या सदनिकेचा ताबाही मिळाला नव्हता. त्यामुळे कागदपत्रे आणि ताबा मिळण्यासाठी त्यांनी मार्च २००९मध्ये ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार केली. यावर न्याय मंचाने निर्णय देताना, निकालानंतर पाटील यांना कागदपत्रे आणि सदनिकेचा ताबा दोन महिन्यांत द्यावा, असे नमूद केले होते. ग्राहक न्याय मंचाने आदेश दिल्यानंतरही त्यांना ती दिली नाहीत. तक्रारदारांनी पैसे देण्याची तयारी दाखवूनही बांधकाम व्यावसायिकाने कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे मत नोंदवत न्याय मंचाने बरकडे यांना तीन महिने साधी कैद आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास जादा वीस दिवस साधी कैद भोगावी असेही आदेशात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम व्यावसायिकाला शिक्षा
By admin | Updated: July 24, 2015 04:07 IST