इंदापूर : काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ताब्यातील सहकारी संस्था अडचणीत आल्या. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला. सत्ता नसताना देखील अडीच वर्षांत विविध विकासकामांना चालना दिली. तरीदेखील विरोधक चुकीचा आरोप करतात. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली. इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भरणे बोलत होते. ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात २० वर्षे काम केले. तरी अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य घटकांना डोळ्यांसमोर ठेवून काम केले. जनतेच्या विकास कामासाठी सरकार कोणतेही असले तरी पाठपुरावा करून तो विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र, सत्तेवर असताना २० वर्षांत तालुक्यात कोणती विकासकामे झाली, याची माहिती विरोधकांनी द्यावी, असेही भरणे यांनी सांगितले. आम्ही करत असलेल्या कामांचे श्रेय देखील घेण्याचे काम काँग्रेसचे नेते आता करीत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने आम्हाला कौल दिला. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जनतेच्या दारात आम्ही जात आहोत. (वार्ताहर)
काँग्रेस नेत्यांमुळे इंदापुरातील सहकारी संस्था अडचणीत : दत्तात्रय भरणे
By admin | Updated: February 17, 2017 04:28 IST