पुणे : विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन भरावे, पुणेकरांमसोर कला सादर व्हावी हे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यभरातील कलावंतांना एकत्र करून सोलापुरातील ‘मॅड’ या संस्थेकडून पुण्यात ड्रीम्स वर्ल्ड हा अनोखा कार्यक्रम आयोजिला असल्याची माहिती मॅड संस्थेचे संचालक विकास गोसावी यांनी दिली.
पुण्यातील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये २८ ते ३० जानेवारीपर्यंत होणाऱ्या ‘ड्रीम वर्ल्ड’ या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आसावरी गांधी, आबोली देशमुख, मेघा शिर्के, बसवराज जमखंडी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विविध कलावंतांचे चित्रप्रदर्शन, फॅशन शो, भारतीय शास्त्रीय व वेस्टर्न वाद्यांचे वादन, बॉडी पेंटिंग, हॅन्डमेड ज्वेलरी, क्राफ्ट ड्रेसेस आदींची प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यादरम्यान चित्रकलेच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिध्द चित्रकार घनश्याम देशमुख व कला व व्यवसाय केंद्राच्या प्राचार्या प्रतिभा धोत्रे यांच्या हस्ते होणार गुरुवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी लोकमंगल शुगर्सचे संचालक महेश देशमुख, आनंद मंत्री, आंचल पटेल, रेखा सुगला यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.
२९ जानेवारी रोजी चित्रकार विनोद विर्णक यांच्या चित्रांचे प्रदर्शन होणार आहे. त्याचवेळी अठरा वर्षावरील व्यक्तींसाठी चित्रकला स्पर्धा आयोजिली आहे. ३० जानेवारी रोजी आर्ट फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यमध्ये बॉडी पेंटिंंग आर्ट, हॅण्डमेड ज्वेलरी, क्राफ्ट ड्रेसेस आदी परिधान करून मॉडेल्स रॅम्प वॉक करणार आहेत.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून यावेळी कोरोनाच्या नियमांचेही पालन करून सर्वांना प्रदर्शन पाहता येणार आहे.