पिंपरी : वर्षभर रुग्णसेवेत मग्न असलेले अनेक डॉक्टर दिवाळीच्या सुटीचे औचित्य साधून बाहेरगावी गेले आहेत. शहरातील मोठी रुग्णालय वगळता अनेक दवाखाने बंद आहेत. त्या मुळे रुग्णांना डॉक्टर शोधण्याची वेळ आली आहे.बहुतांशी नागरीक सरकारी दवाखाना, रुग्णालयापेक्षा खासगी दवाखान्यात उपचार घेणे पसंत करतात. घराजवळच्या अथवा फॅमिली डॉक्टरांकडून ते उपचार घेत असतात. गेले दोन -तीन दिवस अनेक डॉक्टर बाहेरगावी गेल्याने त्यांचे दवाखाने,कन्सल्टिंग रुम बंद आहेत. त्यामुळे आजारी पडलेल्या नागरीकांचे हाल होत आहेत. सुरु असलेल्या खासगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे.वातावरणातील बदलामुळे सर्दी, थंडी-ताप, उलट्या, जुलाब (अपचन) सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसात कमी झालेल्या डेंगीच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. नेहमीचे दवाखाने बंद असल्याने मोठ्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडे नागरीक धाव घेत आहेत. सरकारी रुग्णालये सुरु आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना दोनच दिवस दिवसाआड सुटी देण्यात आली, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. दिवाळीत अनेक लोक बाहेरगावी जातात. त्या मुळे डॉक्टरांसाठी हा काळ ‘स्लॅक’ असतो. वर्षभर कोठेही जाता येत नसलेले डॉक्टर याचा फायदा घेत बाहेरगावी जातात. शहरात सुमारे तीन हजार क्लिनिक आहेत. डॉक्टर बाहेरगावी गेल्याने त्यातील सुमारे ६० टक्के बंद आहेत, असे ‘निमा’ संस्थेचे शहराध्यक्ष डॉ. दत्तात्रय कोकाटे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
दिवाळी सुट्यांमुळे रूग्ण घेताहेत डॉक्टरांचा शोध
By admin | Updated: October 27, 2014 03:31 IST