पुणे : कोणत्याही विषयाचा अभ्यास केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. ‘संगीत’ हा शब्दाने नव्हे तर तीव्र भावातून व्यक्त होणारा विषय आहे. माध्यमातून व्यक्त होणारी गोष्ट युनिव्हर्सल करणे म्हणजे त्या विषयाचे ज्ञान मिळविण्यासारखे आहे. म्हणूनच अर्धवट ज्ञानावर संगीताचे प्रोग्रॅम करू नयेत, असा मोलाचा सल्ला गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी युवा पिढीला दिला. नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गानसरस्वती महोत्सवांतर्गत ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांनी रसिकांशी भाव आणि अर्थपूर्ण संवाद साधला. प्रा. केशव परांजपे आणि नंदिनी यांनी मुलाखतीतून हा सुरेल प्रवास घडविला. ‘संगीताकडे विषय म्हणून पहाण्याची दृष्टी विकसित केली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘तो विषय कसा आहे? त्यातून मला काय मिळवायचे आहे? यमन कुठून आला? त्याची व्याप्ती कशी आहे? या प्रश्नांची उत्तरे त्या विषयाचे आकलन झाल्याशिवाय मिळत नाहीत. कारण विषयाचा सर्वांगीण अभ्यास केल्याशिवाय परिपूर्ण ज्ञान कुणालाच आत्मसात करता येत नाही. स्वत:ला विस्मरून चैतन्यात समरसून जाणे म्हणजे त्या विषयाचा अभ्यास करणे आहे. मला गाणे आले पाहिजे, कार्यक्रम करायचे आहेत; म्हणून संगीताकडे वळणे चुकीचे आहे. गुरू शिष्याला वयाने नव्हे तर ज्ञानाने मोठे करीत असतो. सतरा गुरूंकडे जाऊन ते मिळत नाही, तर त्यासाठी विषयाशी जवळीक साधणे शिष्यांनी आवश्यक आहे. ज्याची शिकवण शाळा-महाविद्यालयांमध्ये मिळत नाही. संगीत, कला, शास्त्र, परफॉर्मिंग आटर््स ही त्या विषयाची विविध रूपे आहेत. या सर्व विषयांचा अभ्यास करणारा हा संगीताचा विद्यार्थी आहे. ‘‘आज शाळा-महाविद्यालयांमध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल हे वेगळे शिकविले जातात. संगीतात मात्र दोन्ही एकच आहे. संगीतात स्वर, लय, ताल, बंदिश यांचा समावेश असतो, या सर्वांगांचा अभ्यास झाला पाहिजे.’’ संगीतात डॉक्टरेट मिळवायची आहे, कारण नोकरी मिळते एवढा संकुचित विचार न करता स्वत:ला त्यातून काही तरी समाधान मिळेल असे काही तरी करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)