लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ईडीने जप्ती आणलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३५४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. बँकेने या संपूर्ण कर्जाला पुरेसे तारण, तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भातून कर्जे देण्यात आली आहे. जरंडेश्वर कारखान्याकडून या कर्जाची वेळेत परतफेड देखील केली जात असल्याचे बँकेने स्पष्ट केले.
जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीकडून विचारणा करण्यात आली आहे. त्याबद्दलचा ई-मेलदेखील बँकेला आला आहे. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले की, पुणे जिल्हा बँक जरंडेश्वर साखर कारखान्याला २०१० सालापासून कर्जपुरवठा करत आहे. त्यावेळी ८५ कोटी रुपयांची कर्जमर्यादा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर माल धाेरण तसेच अल्पमुदत कर्जापोटी बँकेने वेळोवेळी कर्ज दिले आहे. सद्य:स्थितीमध्ये १९० कोटी रुपये साखर तारणावर कर्ज उचलले असून, शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देण्यासाठी हे कर्ज घेतले आहे. तर १६४ कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहे. त्यापोटी कर्जाच्या दीडपट मालमत्ता तारण घेण्यात आली आहे.
ईडीकडून बँकेला या कर्जाबद्दल विचारणा करणारा ई-मेल मिळाला आहे. पीडीसीसी बँकेमार्फत जरंडेश्वर कारखान्याला देण्यात आलेली सर्व कर्जही नियमित आणि पुरेसे तारण घेऊन दिलेली आहेत हा कारखाना सातारा जिल्ह्यात असला, तरी जिल्हा कार्य क्षेत्राबाहेर कर्ज देण्यासाठी शासनाची मान्यता देखील घेतली असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.