कडूस : शिरोली (ता. खेड) गावच्या हद्दीबाहेर शेतात खत म्हणून टाकावयास आणलेल्या कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरल्यामुळे, नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, पावसाळ्यात या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडून परिसरात दुर्गंधी व रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे.कचऱ्यामुळे परिसरात कुत्र्यांसारखी अनेक भटकी जनावरे येत असून, सर्वत्र घाणीची दुर्गंधी पसरवीत आहेत. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर न कुजणाऱ्या वस्तूदेखील असून, रुग्णालयातील कचऱ्याचासुद्धा यात समावेश आहे. शिरोली येथील पोखरण वस्तीवर वाऱ्याबरोबर दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य पै.संजय सावंत, म.न.से.खेड तालुका उपाध्यक्ष मंगेश सावंत, धर्मेद्र पवळे, स्वप्निल पारघे, नवनाथ पवळे, सुधीर बेंढाले, रोहण शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांनी त्वरित कचऱ्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरण्याचा धोका असून त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कचरा टाकणारे शेतकरी अरुण बबन वाळुंज यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली असता, शहरातून आणलेला हा कचरा आपल्या उसाच्या शेतात खत म्हणून वापरण्यासाठी आपण आणला असून, दिवाळीच्या वेळेस उसाच्या शेतात हा कुजलेला कचरा खत म्हणून टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरू नये, यासाठी या कचऱ्यावर जंतूनाशकांची फवारणी व पावडर टाकणार असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शिरोलीच्या उपसरपंच सौ. सुनीता पवळे यांनी सांगितले की, हा कचरा शिरोलीच्या हद्दीत नसून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास मात्र शिरोलीच्या नागरिकांना होत असल्यामुळे शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने शासन दरबारी या कचऱ्याच्या त्रासाबाबत कळविण्यात येणार असून, संबंधित शेतकऱ्यास शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांची अडचण कळविण्यात येणार आहे.
शिरोलीत कचऱ्यामुळे दुर्गंधी
By admin | Updated: June 17, 2015 22:43 IST