पुणे : बहिणीबरोबर मोबाईलवर बोलत असल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करून दिराने भावजयीला हार्पिक हे टॉयलेट क्लिनर पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने त्रास झालेल्या विवाहितेवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पती, दीर व अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गोखलेनगरमध्ये राहणाऱ्या २६ वर्षांच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिला या मोबाईलवर आपल्या बहिणीबरोबर बोलत होत्या. त्यातून त्यांची घरातील लोकांशी वादावादी झाली. फोनवर का बोलते, असे म्हणून पतीने त्यांना मारहाण केली. त्याचवेळी घरातील एका महिलेने फिर्यादीला पकडले. दिराने तिला हार्पिक हे टॉयलेट क्लिनर पाजले. यामुळे फिर्यादीला त्रास झाल्याने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलीस उपनिरीक्षक माळी अधिक तपास करीत आहेत.