लोणी धामणी /मंचर : आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या पश्चिमेला असणाऱ्या गवंडीमळा येथे आज ढगफुटी झाली. यामुळे ओढ्याला मोठा पूर आला. हे पाणी विहिरीत आले का? हे पाहण्यासाठी गेलेले पती-पत्नी व एक वृद्ध विहीर खचल्याने विहिरीतच गाडले गेले. मुलाने पुरात उडी घेऊन आपल्या आई-वडिलांना वाचविले. मात्र, वृद्ध इसम विहिरीत गाडला गेला असून, त्याला शोधण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफची तुकडी तेथे पोहचली आहे मात्र, अंधार असल्याने ते सकाळपासून बचावकार्य सुरू करणार आहेतअरुण गणपत गवंडी (वय ४५), त्यांची पत्नी माधुरी यांना वाचविण्यात यश आले. पांडुरंग आनंदा जाधव (६०) यांचा अद्याप शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पती-पत्नींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. सोबत त्यांचा १८ वर्षीय मुलगा प्रसाद हा होता. आज (दि. १४) दुपारी ही घटना घडली. गेली १० वर्षे एवढा पाऊस धामणीत पडला नव्हता. आज ढगफुटी होऊन परिसरात मोठा पूर आला होता.प्रसाद याचे आई-वडील शेतात बाजरी काढत होते. तासभर मुसळधार पाऊस पडत होता. पाणी पाहण्यासाठी प्रसादचे आई-वडील व पांडुरंग जाधव हे विहिरीवर गेले होते. तेव्हा मोठा आवाज झाला. जवळच असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने प्रसादला दुर्घटना झाल्याचे समजले. आई-वडील विहिरीत पडल्याचे समजतात त्याने विहिरीत उडी मारली. सुरुवातीला त्याने आई माधुरी यांना बाहेर काढले. तोपर्यंत वडील अरुण यांनी लाकूड धरून ठेवले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात प्रसादला यश आले. प्रसादला पोहता येत असल्याने त्याने आई-वडिलांचा जीव वाचविला. दरम्यान, जखमी अरुण व माधुरी यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी त्यांची विचारपूस केली. दुपारी साडेचार वाजता या दाम्पत्याला उपचारांसाठी पुणे येथे हलविण्यात आले. अरुण यांच्या डोक्याला मार बसला आहे. माधुरी यांच्या छातीत दुखत होते. इतर उपचार करण्यासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे़ (वार्ताहर)
धामणीत ढगफुटी
By admin | Updated: September 15, 2015 04:33 IST