पुणे : महापालिकेने केलेला विकास आराखडा जुने पुणे उद्ध्वस्त करणारा असून, काही विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या दबावातून तो तयार करण्यात आल्याचा आरोप आपलं पुणे संस्थेने आज केला. संस्थेने तयार केलेला स्वतंत्र विकास आराखडाही या वेळी सादर करून तो पुणेकरांचे हित साधणारा असल्याचा दावा करण्यात आला. हा आराखडा मुख्यमंत्री, तसेच पालिका आयुक्तांनाही पाठविण्यात आला असल्याची माहिती दिली.नगरसेवक प्रशांत बधे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, अनघा परांजपे, रणजित गाडगीळ आदी या वेळी उपस्थित होते. या सर्वांनीच महापालिकेने तयार केलेला विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप केला. जुन्या पुण्याचा काहीही विचार न करता यात नको त्या ठिकाणी आरक्षणे टाकण्यात आली. रस्ते कारण नसताना रुंद दाखवण्यात आले. यात अनेकांचे नुकसान होणार आहे; मात्र काही विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळेच हा विकास आराखडा आला. त्याचवेळी तो नदीत बुडवावा, असे आम्ही म्हटले होते व त्याच मतांशी आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.ही टीका करत असतानाच नवा, सर्व पुणेकरांचे हित साधणारा विकास आराखडा तयार करण्याचे आव्हान संस्थेने स्वीकारले होते. त्याप्रमाणे तसा आराखडा तयार केला असल्याची माहिती देत तो आराखडा या वेळी सादर करण्यात आला. या आराखड्यात जुन्या पुण्याला आश्वस्त करीत त्यांना दिलासा देण्यात आला आहे. जुने घर डेव्हलपिंगसाठी काढले तर त्या प्रत्येक घरमालकाला वाढीव एफएसआय, २ हजार ५०० एकर पडीक शेतजमिनीचे नियोजन, स्लममध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी सुटसुटीत नियमावली व प्रामुख्याने डोंगरमाथ्यावर बीडीपीचे आरक्षण ही आमच्या विकास आराखड्याची वैशिष्ट्ये असल्याचे या वेळी केसकर व कुलकर्णी यांनी सांगितले. खासगी सोसायट्यांच्या जागांवर टाकलेली आरक्षणेही या विकास आराखड्यात रद्द केली आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
महापालिकेचा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा
By admin | Updated: September 25, 2015 01:42 IST