पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले गट) ५ नगरसेवक भाजपाचे तिकीट व कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र महापालिकेत त्यांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी व्हावी, यासाठी त्यांनी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे अर्ज केला आहे. या अर्जावर विभागीय आयुक्तांकडून आज (शुक्रवारी) निर्णय घेतला जाणार आहे.भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आले असताना रिपाइंचा गट म्हणून मान्यता ५ नगरसेवकांनी मागितली आहे. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. एस. चोक्कलिंगम यांनी याबाबत सांगितले, ‘‘रिपाइंचा अर्ज कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे, उद्या या अर्जाची छाननी करून त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल.’’महापालिका निवडणुकीमध्ये रिपाइंच्या १० उमेदवारांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक न लढवता भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढविल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.
रिपाइंच्या स्वतंत्र गट नोंदणीचा निर्णय आज
By admin | Updated: March 10, 2017 05:09 IST