कोरेगाव भीमा : बेकायदा वाळूउपशामुळे कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीपात्राचा प्रवाह बदलण्याचा धोका असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी ठेकेदाराला सूचना दिल्यानंतर वाळू ठेकेदारनेच नदीप्रवाहास अडथळा ठरणारे ढिगारे सपाट करण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांनी हा विषय समोर आणल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन करून नदीपात्रातील हे ढिगारे पात्रालगत सपाट करण्याची मागणी केली आहे. गेली दोन वर्षांपासून वाळू लिलावास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांनी थेट नदीपात्रातच निरुपयोगी वाळूचे ढिगारे उभे केल्याने नदीचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे नदीपात्रालगत असणाऱ्या अनेक वस्त्यांना पुराचा धोका होणार आहे. आज ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तत्काळ बातमीची दखल घेत महसूल विभागाने कोरेगाव भीमा येथील वाळू ठेकेदारास वाळूउपसा बंद करण्यास सांगून नदीचा प्रवाह बदलण्यास कारणीभूत ठरणारे वाळूचे ढिगारे सपाट करण्याचे काम करण्याचे आदेश दिले. वाळू ठेकेदाराने तीन पोकलेनच्या साहाय्याने वाळूचे ढिगारे सपाट करण्याचे काम चालू केले आहे. परंतु हे ढिगारे नदीपात्रात न ढकलता पात्राच्या कठड्यावर लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. जेणे करून पुराचा गावास होणारा धोका टळू शकतो. (वार्ताहर)अंकुश कोणाचा वाळूउपसा करण्यासाठी ताबा देताना मंडलाधिकाऱ्यांनी ठेकेदारास वाळू उपसण्यासाठी नदीपात्रात सीमांकन करून देणे बंधनकारक असताना महसूल विभाग वाळू उपशाची सीमाच स्पष्ट होत नाही. त्यात वाळूउपसा करण्यासाठी खनिकर्म विभागाची कोणतीच परवानगी न घेता वाळू ठेकेदार नदीपात्रात थेट पोकलेन व यांत्रिक बोटीच्या साहाय्याने बेकायदा वाळूउपसा सुरू करीत असल्याने या वाळूमाफियांवर अंकुश कोणाचा, हा सवाल उपस्थित होत आहे.
भीमा नदीपात्रातील ढिगारे हटविले
By admin | Updated: June 18, 2015 23:13 IST