पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे-नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड, जि. पुणे) जवळ एकतानगर येथे बुधवारी (दि.१५) रात्री साडे नऊला घडली. भरधाव मोटारीने पादचारी इसमास दिलेली धडक इतकी जोरदार होती, की धडकेनंतर संबंधित इसम पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकला गेला. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने मोठा जमाव जमला मात्र त्यातूनही भरधाव मोटार चालकाने पोबारा केला. मात्र नागरिकांनी संबंधित मोटारीचा क्रमांक तत्काळ पोलिसांना दिल्याने पोलिसांनी संबंधित मोटारीचा व चालकाचा शोध घेतला आहे.महंमद सज्जनभाई इनामदार (वय ७५ रा. एकतानगर चाकण) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. बुधवारी रात्री साडे नऊला पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मोटारीची (एमएच ४६ एएक्स ९६३९) चाकणजवळ प्रोटॅक्टो कंपनीसमोर एकतानगर येथे पादचारी इनामदार यांना जोरदार धडक बसली. भरधाव मोटारीची धडक बसल्याने ते सुमारे १५ ते २० फूट अंतरावर फेकेले गेले. परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पहिल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. मात्र संबंधित मोटारचालकाने पोबारा केला होता. नागरिकांनी जखमीस तातडीने रुग्णालयात नेले. (वार्ताहर)
मोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
By admin | Updated: February 17, 2017 04:38 IST