नारायणगाव : सध्याच्या भाजपा सरकारने आरएसएसच्या मदतीने शिक्षणाचे भगवेकरण चालविले आहे. काळा पैसा आणण्याची घोषणा, नोटाबंदी करणाऱ्या सरकारमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नारायणगाव येथे केली. राष्ट्रवादीच्या नारायणगाव गट व गणातील उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त जाहीर सभेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले, की लोकसभेच्या वेळी एक जादूगार आला. सर्वांना भुलीचे इंजेक्शन दिले व अच्छे दिन लाऊंगा असे सांगितले. पण कुठे आहेत अच्छे दिन? केंद्रातील सत्तेत असलेले खासदार आढळराव म्हणतात, कुठे आहे अच्छे दिन? अशी अवस्था आहे या सरकारची आहे. भाजप व सेनेची युती असली तरी सेनेच्या मंत्र्यांना काहीही अधिकार नाहीत. नावाला मंत्री पदे आहेत. विविध घोषणा केल्या; पण अमलात नाही. शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्याने शेती केली नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडेल, असे शेवटी वळसे पाटील यांनी सांगितले. या वेळी नेताजी डोके, अतुल बेनके यांचीही भाषणे झाली. (वार्ताहर)
भाजपा शिक्षणाचे भगवेकरण करतेय : वळसे पाटील
By admin | Updated: February 17, 2017 04:31 IST