लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु जिल्ह्यातील आमदारांना कोरोनाचे काही गांभीर्य आहे किंवा नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण शुक्रवार (दि.२५) रोजी घेण्यात आलेल्या जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीसाठी २१ आमदारांपैकी केवळ दोनच आमदार उपस्थित होते. एरवी अजित पवारांचा उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला वेळेआधीच हजर असणाऱ्या आमदारांना शुक्रवारी अक्षरशः फोन करून बोलावून घेण्याची वेळ प्रशासनावर आली.
पुण्यामध्ये दर आठवड्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना आढावा बैठक होते. शुक्रवारी मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बैठक घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, ॲड. वंदना चव्हाण उपस्थित होते. पण अनेक आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. अजित पवार नसल्याचे माहीत असल्यानेच आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याची चर्चा होती. फक्त राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे आमदार देखील बैठकीला फिरकले नाहीत. बैठक सुरू झाल्यानंतर अशोक पवार हे एकच आमदार उपस्थित असल्याने काही आमदारांना अक्षरशः फोन करून बोलावून घेण्याची वेळ प्रशासनावर आली. बैठक सुरू झाल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी हजेरी लावली. परंतु या निमित्त कोरोनाबाबत लोकप्रतिनिधी खरंच गंभीर आहेत का ? असा सवाल आज पुण्यात विचारला जातो आहे.