पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बहुतांश दहीहंडी उत्सव मंडळांनी पाण्याचा वापर टाळून गोविंदा आला रे, गोविंदा आलाचा घोष करीत दहीहंडी उत्सव साजरा केला. पाण्याऐवजी यंदा रंगेबेरंगी कागद, चमकी उडवली जात होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कमी फुटाचे थर उभारण्याकडे मात्र काही मंडळांकडून दुर्लक्ष करण्यात आले. सुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी रात्री नऊ वाजता गणेश मित्र मंडळ कसबा पेठ यांनी फोडली, तर बाबू गेनू तरुण मंडळाची हंडी शिवतेज मंडळाने रात्री ९.४० ला फोडली.राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले आहे, या पार्श्वभूमीवर मंडळांनी दहीहंडी उत्सवामध्ये पाण्याचा वापर करणे टाळले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींनी डीजेच्या तालावर मनमुराद नाचत आनंद लुटला. हे आनंदाचे क्षण सेल्फी काढून फोटोमध्ये साठविताना अनेकजण दिसून येत होते. अखिल डेक्कन मित्र मंडळ, आराधना स्पोर्ट क्लब यासह अनेक दहीहंडी मंडळांनी उत्सव साजरा केला. चित्रपट, मालिकांमधील अभिनेते, अभिनेत्रींचे आर्कषण यंदाही दिसून आले, विविध मंडळांच्या दहीहंडी उत्सवासाठी ‘बाहुबली’फेम तमन्ना भाटिया, ‘सिंघम’ फेम काजल अगरवालपासून ते स्पृहा जोशीसह अनेक तारकांनी हजेरी लावली. त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.वंदेमातरम संघटना व युवा फिनिक्स संघटनेच्यावतीने पुस्तकांच्या भिंती उभारून दहीहंडी साजरी करण्यात आली. या अंतर्गत दीड हजार पुस्तके जमविण्यात आली होती. सामाजिक भान जपलेज्ञानेश्वर पादुका चौकातील पोलीस मित्र संघटनेने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव रद्द केला. अखिल बाणेर बालेवाडी-महाळुंगे दहीहंडी उत्सव समितीने दहीहंडी रद्द करुन वर्गणीतून येणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला. औैंध परिसरातील १२ सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेतला. वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना ऊबदार कपड्यांचे वाटप करून अनोखी दहीहंडी साजरी करण्यात आली.सुरक्षितेची काळजीबाजीराव रस्त्यावरील नातूबाग मित्र मंडळाने दहीहंडी संघांच्या सुरक्षितेसाठी खाली जाळी उभारली होती. दहीहंडी फोडताना एखादा गोविंदा पडला तरी तो जखमी होऊ नये, म्हणून अत्यंत अभिनव असा हा उपक्रम त्यांनी राबविला. मात्र काही ठिकाणी जास्त उंचीचे थर उभे करू नयेत, लहान मुलांचा वापर टाळावा, या न्यायालयाने दिलेल्या निर्देशाकडे मंडळांनी दुर्लक्ष केले.
पाण्याचा वापर टाळत साजरी झाली दहीहंडी
By admin | Updated: September 7, 2015 04:42 IST