लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ‘चावटपणा’ हा मनुष्याचा स्थायिभाव असून तो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतोच. याच स्थायिभावाचा पुरेपूर उपयोग करून दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवले. त्यांच्या या द्विअर्थी विनोदामुळे त्यांना अनेकदा सेन्सॉर बोर्डाशी देखील झगडा द्यावा लागला. परंतु, त्यांनी ग्रामीण महाष्ट्रातील त्यांच्या प्रेक्षकांची प्रतारणा केली नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेशी जोडलेली नाळ कायम ठेवत दादांनी त्यांच्या अभिरुचीला पटेल असेच चित्रपट दिले, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
दादा कोंडके फाऊंडेशनतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या समाज पुरस्काराचे वितरण सबनीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. यंदा २०२० आणि २०२१ साठी अनुक्रमे दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राच्या लेखिका अनिता पाध्ये आणि रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांना प्रदान करण्यात आला. तब्येतीच्या कारणास्तव लेखिका अनिता पाध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाही.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण पुणे कार्यालयाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, दादा कोंडके फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त आणि कार्यक्रमाचे निमंत्रक मनोहर कोलते, फाउंडेशनचे सचिव राजेंद्र भवाळकर, जिल्हा सरकारी वकील एन. डी. पाटील, खजिनदार विक्रम जाधव उपस्थित होते.
या वेळी अॅड. एन. डी. पाटील, उद्योगपती नितीन थोपटे, आदिवासी लघुपटांचे निर्माते डॉ. कुंडलिक केदारी, कीर्तनकार पूनम जाचक आणि क्रीडापटू वैदही आणि श्रुतिका सरोदे तसेच विद्युत वितरण नियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र गायकवाड आणि ह्युमन राईट्स पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल अमरसिंह राजपूत (परदेशी) या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुवर्णा माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर खजिनदार विक्रम जाधव यांनी आभार मानले.
---------------------------------------
फोटो - दादा कोंडके