पुणे : चारचा प्रभाग केल्याने अनेक प्रभागांमध्ये आपल्या प्रभागातील अन्य गटातील उमेदवारांची सेटिंग केली असल्याने जवळपास सर्वच प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याची जोरदार चर्चा असून त्याचा धसका सर्वच प्रमुख उमेदवारांनी घेतला आहे़ एका प्रभागात ४ गट असल्याने सर्वच पक्षांनी त्यातील प्रमुख उमेदवाराला अन्य तीन उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली होती़ त्यादृष्टीने बहुसंख्य प्रभागात एकाच पक्षाच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचा काळात एकत्र पदयात्रा काढून आम्ही सर्व जण एक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला़ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ३० प्रभागांत आघाडी होती़ त्यातील दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी एकत्रित प्रचार केला़ पण, उघड प्रचार संपल्यानंतर प्रत्येकाने आपली सीट जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला़ त्यातून आपल्याला मत दिले तर दुसऱ्या गटात तुम्हाला चालविण्यास सांगू अशा खेळ्या करण्यास सुरुवात केली़ त्याचबरोबर स्थानिक निवडणुकीत आपल्या परिसरात एखाद्या पक्षाचा अथवा जवळचा उमेदवार असल्यास अनेकांनी त्याला मत दिले असले तरी अन्य गटांमध्ये मत देताना त्याच पक्षाच्या उमेदवाराला मत दिलेच असे नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे़ त्यातूनच मग, प्रभागातील एखाद्या भागात हा उमेदवार जोरात चालला़ पण, दुसऱ्या भागात त्याचे पारडे जड असल्याचे सांगितले जाऊ लागले़ (प्रतिनिधी)झोपडपट्टी भागात सायंकाळी झालेल्या जोरदार मतदानामुळे ही मते कोणाच्या पारड्यात जाणार याविषयी मोठ्या प्रमाणावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत़ शेवटच्या दोन तासांत मधल्या कार्यकर्त्यांनी लालुच दाखवून मतदानासाठी लोकांना बाहेर काढले, पण मतदार त्यांनाच मते देतील का, याविषयी आता शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे़ त्यात एकाला चार मते द्यायची असल्याने त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकाला मत दिले तरी, बाकीच्या गटात त्यांच्याच पक्षातील उमेदवारांना मते दिली का याविषयी शंका घेतली जाऊ लागली आहे़ त्यामुळे सर्वच प्रभागात क्रॉस व्होटिंगची शक्यता वाढली आहे़ त्याचा परिणाम सोमवारपर्यंत आपली सीट नक्की असे सांगणारेही आता सावध पवित्रा घेऊ लागले आहे़ मतदान झाल्यानंतर अनेकांना आपली गणिते बिघडल्याची जाणीव झाली आहे़ त्यामुळे सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत़
क्रॉस व्होटिंगचा घेतला धसका
By admin | Updated: February 23, 2017 03:32 IST