अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:23+5:302021-05-06T04:09:23+5:30

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसह करंजविहिरे ते चाकण दरम्यानच्या जलवाहिनीला खेटून असलेल्या गावांना वाजवी दरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला ...

Crisis of water cut in 18 villages | अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट

अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट

Next

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसह करंजविहिरे ते चाकण दरम्यानच्या जलवाहिनीला खेटून असलेल्या गावांना वाजवी दरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील कंपन्या तसेच वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण, बिरदवडी, खराबवाडी आदी ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून गेली १० ते १२ वर्षे या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जातो आहे. परंतु सध्या स्थानिक लोकसंख्येच्या तीन ते चार पट वाढलेल्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी या योजना कमी पडत आहेत. या योजनेची पाणी साठवण क्षमता आणि वितरण व्यवस्था मर्यादित स्वरूपाची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची सध्याची पाणी साठवणूक क्षमता सरासरी पन्नास टक्केच आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या जलवाहिनीतून सर्व गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक दिवशी पाणी योजनेची मोटार १२ ते १८ तास सलग सुरू ठेवावी लागते. यामुळे ग्रामपंचायतीना अधिकचा भार सहन करावा लागतो.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चाकण एमआयडीसी, म्हाळुंगे कोविड सेंटर, म्हाळुंगे गाव, खराबवाडी आदी गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेशे पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व्ह २४ तास सुरू असायचा, आता मात्र फक्त १२ तास हा व्हॉल्व्ह सुरू ठेवून पाणी उचलण्याच्या तोंडी सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत. यावर एमजीपीचे कर्मचारी स्वतः लक्ष ठेवून १२ तास होताच ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित केला जातो आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेत आवश्यक पाणी साठवणूक होत नसल्याने नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रत्येक गावाला दीड ते दोन लाख लिटर पाणी लागते; मात्र सध्या १२ तासांत फक्त ९० हजार ते एक लाख लिटर पाणी मिळत आहे. यामुळे भविष्यात आणखीन पाणी कपातीचे संकट स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

थकबाकी व मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी देता येत नसल्याने जलवाहिनीचे व्हॉल्व्ह बंद केले जातात. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर म्हाळुंगे कोविड सेंटरला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कालमर्यादेत बदल केला असे कर्मचारी सांगत आहेत. यामध्ये विसंगती आढळत असून जर थकबाकीमुळे पाणीपुरवठा खंडित केला जातो आहे, मग ज्यांचे वैयक्तिक नळ जोडणी बिले भरले असतानाही त्याचे व्हॉल्व्ह का बंद केले जातात? एकंदरीत ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात सुसूत्रता नसून सावळा गोंधळ दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. याबाबत त्यांना सविस्तर थकबाकी नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नाही. कोरोनाचे कारण पुढे करून वेळ ढकलली जात आहे. त्यात विशेष म्हणजे सर्वच ग्रामपंचायती मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहेत. अधिकचे पाणी घेण्यासाठी जिल्हा परिषदकडून नव्याने पाणी योजना करावी लागेल. चाकण पालिकेने स्वतःची पाणी योजना आखली असून, ती पूर्ण झाल्यावर शिल्लक पाणी साठ्यातून ग्रामपंचायतींना ते पाणी देता येईल. मात्र थकबाकी पूर्णपणे भरल्यास विचार करू. - संजय पाठक, मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

--------------------------------------------------------

* फोटो - भामा आसखेड धरण.

Web Title: Crisis of water cut in 18 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.