थेरगाव : ‘सैराट’ या बहुचर्चित चित्रपटाच्या चित्रफितींची कॉपी करून विक्री करणाऱ्या थेरगावातील एका विक्रेत्यावर कॉपीराइट कायद्यांतर्गत वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुलतान मिटू शेख (वय ३०, रा. क्रांतिवीरनगर, आनंद बाग, थेरगाव) असे त्या आरोपीचे नाव आहे. चित्रपट निर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांचे स्वामित्व हक्क (कॉपीराइट) प्राप्त असलेल्या सुनील शिवाजी मर्ढेकर (वय ३५, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या फिर्यादीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. शंभर रुपयांत सैराट, नटसम्राट चित्रपट पेनड्राइव्ह, डीव्हीडीमध्ये कॉपी करून देत असल्याचे समजताच मर्ढेकर यांनी त्या दुकानावर छापा टाकला. त्याच्याकडील संगणक, प्रिंटर, ५ कार्डरिडर, दोन डोंगल, हिंदी, मराठी चित्रपटांची पोस्टर्स असा ३० हजार ३५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)
सैराट चित्रपटाच्या कॉपीप्रकरणी गुन्हा
By admin | Updated: May 12, 2016 01:30 IST