पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालिका प्रशासनाकडून खाटा वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. आता शहरातील २० पेक्षा अधिक खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचार सुरू केले जाणार आहेत. या खासगी रुग्णालयांमधील खाटा ताब्यात घेण्यात येणार आहेत. यामधून प्रसूतिगृह, ऑर्थोपेडिक आणि डोळ्यांचे दवाखाने वगळण्यात येणार आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यासोबतच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आकडाही फुगत चालला आहे. खासगी रुग्णालयांमधील खाटा पालिकेने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्यवस्थापनासोबतच लसीकरणावरही भर देण्यात आलेला आहे. पालिकेने २० पेक्षा अधिक खाटा असलेल्या २४३ खासगी रुग्णालयाची यादी केंद्र शासनाला पाठविली होती. शासनाकडून याबाबत अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या रुग्णालयांची क्षमता कोविड उपचारांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून प्रसूतिगृह, ऑर्थोपेडिक आणि डोळ्यांचे हॉस्पिटल वगळण्यात येणार आहेत. उर्वरित रुग्णालयांमधील खाटा उपलब्ध होणार आहेत.
---///----
‘नायडू’त आणखी ५० रुग्ण उपचार घेणार
डॉ. नायडू रुग्णालयातील एक मजला रिकामा असून हा मजला कोविड उपचारांसाठी सुरू केला जाणार आहे. प्रशासनाकडून याठिकाणी ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नायडू रुग्णालयात आणखी ५० रुग्ण उपचार घेऊ शकणार आहेत.