शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सोमवार (दि.६) पासून १३ जुलैपर्यंत 'लॉकडाऊन' जाहिर करण्यात आले आहे. संबंधित निर्णय जिल्ह्याधिकारी राम तसेच प्रांताधिकारी संजय तेली यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली. आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच आळंदी पोलिस ठाण्यातील सात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देहू फाट्यावर तीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेता 'शहर बंद'ची ठेवण्याची मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती. या अनुषंगाने राजगुरूनगर येथे शनिवारी (दि.४) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपाययोजनांसाठी विशेष बैठक पार पडली. यामध्ये विशेष खबरदारी म्हणून कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आळंदी शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा तसेच लॉकडाऊन घोषित करण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे. यापार्श्वभूमीवर आळंदी नगरपालिका प्रशासनाने शहरात ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शहरात बंदच्या काळात बँक, पतसंस्था, हॉस्पिटल, मेडिकल तसेच अन्य अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून किराणा दुकाने, भाजीपाला व दूध विक्री सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहे. शहरात बंदच्या काळात विवाह सोहळ्याला मज्जाव केला असून मंगल कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत. लॉकडाऊन काळात तसेच त्यानंतर नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले असून विनामास्क आढळून आल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 20:01 IST
आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
ठळक मुद्देआळंदी पोलिस ठाण्यातील सात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट