नीरा : पुरंदर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दररोज ३० च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. या चार दिवसांत ११९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत २७८ रुग्ण सक्रिय असून १ लाख ६६ हजार ४५२ व्यक्तींचे लसीकरण झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील विविध तपासणी केंद्रात ९१४ संशयितांची तपासणी या चार दिवसांत करण्यात आली. यामध्ये तब्बल ११९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. बुधवारी २७९ संशयितांची तपासणी करण्यात आली, पैकी २० व्यक्तींचे अहवाल बाधित आले. गुरुवारी २७३ संशयितांची तपासणी करण्यात आली त्यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल बाधित आले. शुक्रवारी रोजी २१० संशयितांची तपासणी करण्यात आली, पैकी ५२ व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर शनिवारी १५२ संशयितांची तपासणी करण्यात आली, पैकी २८ व्यक्तींचे अहवाल बाधित आले. तालुक्यातील विविध रुग्णालयात व कोरोना केअर सेंटर मध्ये २७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत सासवड शहर अंतर्गत ६३, परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५८, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४४, बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३८, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २५, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १४, जेजुरी शहर अंतर्गत ८ रुग्ण सक्रिय आहेत. तर शनिवारी २८ रुग्णांची भर पडल्याने आता तालुक्यात २७८ रुग्ण सक्रिय आहेत.