लोकमत न्यूज नेटवर्क
कदमवाकवस्ती : गुरुवारपासून पाचवी ते आठवी शाळा सुरू झाल्या. मात्र, अद्यापही काही पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तयार नसल्याने त्यांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
कोरोना संसर्गामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त,र मंगळवारपासून पाचवी ते आठवीच्या वर्गाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने पूर्व हवेलीतील बहुतांश खासगी शाळांमध्ये शाळा प्रशासनाने पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आपल्या मुलांच्या ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये ७५ टक्के पालकांनी आपल्या मुलांना ऑफलाईन शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी संमतिपत्रावर होकार दर्शविला असून उर्वरित २५ टक्के पालक ऑफलाइन शिक्षणासाठी अनुत्सुक दिसत आहेत. कारण, शाळा प्रशासनाकडे विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी नसून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याची व आणण्याची जबाबदारी ही पूर्णतः पालकांची असल्याने उर्वरित २५ टक्के पालक ऑफलाईन शिक्षणास नकार दर्शवित आहेत. त्यांच्या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, अशी मागणी करीत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक हे कामानिमित्त सकाळीच बाहेर पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत सोडणे व आणणे हे कठीण असल्याने ही मागणी होत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आले असून फक्त एक महिना शिल्लक असल्याने ऑनलाइन शिक्षणच सुरू राहावे, असा सूर काही पालकांचा आहे.
चौकट
यासंदर्भात, खासगी शाळा प्रशासनासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, जर पाचवी ते आठवीचे ऑफलाईन वर्ग सुरू केल्यावर शाळेत उपस्थित नसणारे इतर २५ टक्के विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यासाठी शिक्षक वर्गावर जादा भार पडू शकतो म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या पालकवर्गाशी चर्चा करून १०० टक्के पालक राजी झाल्यावरच ऑफलाईन वर्ग सुरू करणार आहोत. ज्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असाच निर्णय घेणार आहोत.
कोट
मी लोणी स्टेशन येथील एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. मला सकाळ, दुपार किंवा रात्री अशा कोणत्याही शिपला जावे लागते. मुलांची शाळा घरापासून लांब असल्याने बस नसल्याने शाळेत जाणे अशक्य आहे.
- दीपक निवासराव पाटील
पालक- कदमवाकवस्ती