पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र सादर करणे बंधनकारक आहे, परंतु महाराष्ट्रभर वास्तव्यास असलेले अनेक जैन साधू व साध्वी या लसीकरण मोहिमेपासून वंचित राहिले आहेत. कारण बहुतांश साधू आणि साध्वींकडे ओळखपत्र नसते. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी अखिल मंडई मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांना ही मागणी करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जैन मंदिरे व स्थानके आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जैन साधू व साध्वी वास्तव्यास असतात. प्रवचनांमुळे जैन साधू व साध्वींना महाराष्ट्रभर, तसेच भारतभर सतत भ्रमण असते, त्यामुळे त्यांचा कोणताही कायमस्वरूपी पत्ता उपलब्ध नाही.
अण्णा थोरात म्हणाले, अनेक जैन साधू आणि साध्वींकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय ओळखपत्र, आधार कार्ड नसते. समाजप्रबोधनाचे कार्य निस्वार्थपणे करणाऱ्या या जैन साधू व साध्वींना लसीकरण मोहिमेचा लाभ घेता यावा, याकरिता विशेष योजना राबवावी, ही विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांना करण्यात आली आहे.