जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:17+5:302021-07-02T04:08:17+5:30

(रविकिरण सासवडे) बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे ...

The company was set up by farmers in rural areas | जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

Next

(रविकिरण सासवडे)

बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे कौशल्य आपण शिकले पाहिजे. याच जाणिवेतून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून गळीत धान्याच्या उत्पादनातून खाद्यतेल प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. तर, पुढील काळात या कंपनीच्या माध्यमातून ५०पेक्षा जास्त घरगुती तेलघाणे उभारून सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवण्यासाठी कृषी विभागाने विडा उचलला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिरायती भागातील शेतीउत्पादन कायम अडचणीत येत असते. येथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी उद्योजक होण्यापूर्वी कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जिरायती भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी, चारा पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतात. यामध्ये आंतरपीक म्हणून करडई, भुईमूग, आदी पिकांचा अंतर्भाव केला जात असे. कृषी विभागाने मागील दोन हंगाम तेल बियांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. केवळ तीन ते चार महिन्यांत शेतकरी उत्पादन घेऊन सक्षम होऊ लागला होता. कंपनीने सध्या दोन तेल घाणे राजकोट येथून खरेदी केले आहेत. शेतकरी गटांना सामावून घेत, परिसरात तेल बियांचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सध्या आमच्या शेतकरी कंपनीशी १७० शेतकरी जोडले गेले आहेत. यंदा आम्ही १०० एकर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. सध्या भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. तर खरिपात ५० एकर करडई, १०० एकर सूर्यफुलाची पेरणी करण्यात येणार आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या भूईमुगापासून कमी प्रमाणात तेलाची रिकव्हरी मिळत होती. त्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हैदराबाद कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला यंदा आयसीजीबी ३०४३ या वाणाचे भूईमुगाचे बियाणे मिळाले आहे. शेतकरी स्वत:च्या शेतातील तेलबियांचे तेल काढून विकत असल्याने आमच्याकडे मागणी देखील मोठ्याप्रमाणावर आहे.

- सुनील जगताप

संचालक

ॲग्रो स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारामती

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात यशस्विपणे उतरणे गरजेचे आहे. जिरायती भागात तेल बियांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारल्याने इतरांसाठी ते प्रेरणादायी आहेत.

दत्तात्रय पडवळ

तालुका कृषी अधिकारी, बारामती

बारामती तालुक्यातील तेल बिया

उत्पादनाची आकडेवारी( हेक्टरमध्ये )

तेलबिया २०१९-२० २०२०-२१

सोयाबिन ३१८.६० १५४२.९०

सूर्यफूल ३२.४० ८२.८०

भुईमूग ४३.१० ७१५.६०

करडई १५ ३६.६०

बारामती येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी अंतर्गत सध्या तेल गाळपासाठी उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.

३००६२०२१-बारामती-१४

Web Title: The company was set up by farmers in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.