बारामती : फळे, भाजीपाला शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी राज्य सरकारने मान्यता दिल्याने आज बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत व भुसार व्यापाऱ्यांनी बंद पाळला. या बंदचा किरकोळ भाजीपाला विक्रीवर काही परिणाम झाला नाही. बारामती बाजार समितीच्या शहर व जळोचीतील आवारात दिवसभर शुकशुकाट होता. बाजार समित्यांचा अडसर दुर करुन शेतकऱ्यांनी पिकविलेला फळे भाजीपाला ग्राहकांच्या दारात थेट विक्री करण्यास शासनाने मान्यता दिली. यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करण्यास तत्वता मान्यता दिली आहे.या पार्श्वभुमीवर बाजार समितीच्या आवारात भुसार मालाच्या मार्के टमध्ये हमाल मापाडी संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला होता. त्यामुळे त्याला येथील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. तर भाजीपाला नियंत्रणमुक्त झाल्याने जळोची येथील मार्केट बंद ठेवण्यात आले. या संदर्भात बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले की, भाजीपाला नियंत्रण मुक्तीमुळे बाजार समितीच्या कर्मचारी, हमाल, मापाडी आदींवर गंभीर परिणाम होणार आहेत. तसेच, व्यापाऱ्यांचे देखील अडचण होईल. शेतकऱ्यांना मालाच्या विक्रीला अडचण येईल. मुंबई, पुणे सारख्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट माल विक्री करताना मोठी समस्या निर्माण होईल. दरम्यान, व्यापाऱ्यांनी पाळलेल्या बंदचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्या नेतृत्वाखाली प्रति आंदोलन करण्यात आले. व्यापारी चुकीची भूमिका घेत आहेत. थेट माल विक्रीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे व्यापारी या नव्या कायद्याला विरोध करीत आहे, असे ढवाण यांनी सांगितले. नारायणगाव : शेतकऱ्याने पिकवलेला फळे व भाजीपाला ग्राहकांना थेट विक्री करण्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपासून भाजीपाला, डाळींब खरेदी-विक्री बंद ठेवली आहे. जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असणाऱ्या नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, बेल्हा येथील भाजीपाला मार्केट दोन दिवसांपासून बंद आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिरीष बोऱ्हाडे यांनी दिली़ राज्य शासनाने पणन कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे़ दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी-विक्री बंद असल्याने बाजार समितीच्या वतीने सूचनाफलक लावण्यात आले होते़ त्यामुळे शेकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही़ जे शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आले होते़ त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आणलेला भाजीपाला मुंबईच्या व्यापाऱ्यांना पाठविण्यात आला़ आळेफाटा येथील डाळिंब मार्केटही आज बंद ठेवण्यात आले़ ओतूर येथील भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आल्याचह माहिती बाजार समिती संचालक शिरीष बोऱ्हाडे यांनी दिली़मंचर :राज्य सरकारने फळे व भाजी नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा निषेध म्हणून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. एरवी गजबजलेल्या बाजार समितीत आज शुकशुकाट होता.महाराष्ट्र राज्य सरकारने फळे व भाजी नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी बाजार समितीमध्ये एकदिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील सर्व व्यापारी व माथाडी संघटनांनी घेतला होता. त्यानुसार मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बंद पाळण्यात आला.एरवी बाजार समिती दिवसभर गजबजलेली असते. बंदमुळे आज तेथे शुकशकाट पसरला होता. तरकारी बाजारात काही शेतकऱ्यांनी त्यांचा माल आणला होता. मात्र बंदमुळे त्यांच्या मालाची विक्री झाली नाही. चांगला पाऊस पडल्याने बटाटा वाणाला मागणी वाढणार होती. मात्र व्यापाऱ्यांनी आज बंद पाळल्याने बटाटा वाणाची विक्री झाली नाही. सायंकाळी मेथी, कोथिंबीर वाणाची विक्री झाली नाही. बाजार समितीतील बंदमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता आला नाही. नवी मुंबई येथील कांदा, बटाटा मार्केटमध्ये यासंदर्भात व्यापारी व्यवसायांशी निगडित घटकांची सभा आयोजिली होती. त्या सभेसाठी मंचर येथून अनेक जण गेले होते.
बाजार समितीत कडकडीत बंद
By admin | Updated: July 5, 2016 03:03 IST