बारामती : प्रौढांपाठोपाठ किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या दृष्टीने आता देशभरात चाचण्या सुरू झाल्या आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयाची या चाचण्यांसाठी निवड करण्यात आली आहे. बारामतीत तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी केली जाणार आहे. येथील डॉक्टरांवर याबाबत प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
शहरातील बारामती हॉस्पिटलमध्येही १०० ते १५० मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. २८ दिवसांच्या कालमर्यादेत या मुलांना तीन डोस देण्यात येणार आहेत. त्यानंतर या मुलांमध्ये होणाऱ्या परिणामांचे आरोग्य निरीक्षण नोंदविले जाणार आहे. तसेच या लसीच्या परिणामांचा अभ्यास देखील केला जाणार आहे.
लसीकरण करण्यापूर्वी या मुलांच्या आरटीपीसीआर तपासणी तसेच त्यांच्यातील अँटीबॉडीजच्या तपासण्याही केल्या जाणार आहेत. बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या प्रक्रियेमध्ये प्रिन्सिपल इनव्हेस्टिगेटर म्हणून कार्यरत असतील. एका कंपनीच्या लसीची ही चाचणी होणार आहे. मुलांमध्ये लस देण्यापूर्वी व नंतरचे बदल याबाबतचे निरीक्षण बारकाईने नोंदविले जाणार आहे.
लहान मुलांसाठी देशात आजही कोणत्याच कंपनीच्या लसीला संपूर्ण मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांकडून लसीच्या चाचण्या वेगाने सुरू आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार ही बाब बारामतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशीच आहे. मेडिकल हब म्हणून आता पंचक्रोशीमध्ये बारामतीची ओळख होत आहे. या चाचण्यांमुळे बारामतीचे संशोधन क्षेत्रात नाव नोंदविले जाईल.
१२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चाचण्या सुरू आहेत. बारामती शहरात या चाचण्या होणार आहे. त्यानंतर या मुलांना लसीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संभाव्य तिसरी लाट व लहान मुलांना होणारा धोक्याच्या चर्चा पाहता पालकांना या लसीची मोठी प्रतीक्षा आहे.