लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून चित्रपटगृहांचा पडदा उघडला असला, तरी एकही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे चित्रपटगृहांना थंड प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे ‘ओटीटी’वर नवीन चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शनाचा निर्मात्यांनी धडाका लावल्याने प्रेक्षकवर्ग ओटीटीवर रमल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाने मनोरंजनाची सर्व समीकरणे बदलली असून, लॉकडाऊनच्या काळापासून ‘ओटीटी’ मध्येच रेंंगाळलेला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे पुन्हा खेचण्यासाठी ‘हाऊसफुल्ल’चा फलक लागू शकेल असा नवीन चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची आवश्यकता आहे. मात्र, ५० टक्के क्षमतेमध्ये तूर्तास तरी हे शक्य नाही, असे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देऊन चालकांच्या आशा पल्लवित केल्या असल्या, तरी राज्य सरकारच्या मंजुरीची मल्टिप्लेक्स चालकांना प्रतीक्षा आहे.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृह आणि चित्रपटगृहांचा पडदा बंद ठेवला. त्यामुळे प्रेक्षकांनी घरबसल्या हातातील मोबाईल आणि लॅपटॉपवर ‘ओटीटी’च्या माध्यमातून वेबसिरीज आणि चित्रपट पाहण्याचा मार्ग निवडला. शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्र खुली केली. तसं मनोरंजनाचे दालनही सुरू केलं. परंतु शासनाने ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास सांगितल्यामुळे मल्टिप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटगृह चालकांची अडचण झाली. या निर्णयाचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून एकपडदा चित्रपटगृह चालकांनी चित्रपटगृह सुरू करण्याचे धाडस दाखविले नाही. मात्र मल्टिप्लेक्स चालकांनी चित्रपटगृहांचा पडदा उघडला. परंतु मल्टिप्लेक्स सुरू होऊन दोन महिने झाले, तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद अद्याप थंडच आहे. यातच ‘ओटीटी’ वर लक्ष्मी बॉम्ब, लव्ह इज नॉट इनफ सर’ तसेच ‘तांडव’, ’क्राईम जस्टिस’ सारख्या वेबमालिका प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक ओटीटीवरच चित्रपट पाहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू झाली तरीही ओटीटीवर रमलेले प्रेक्षक पाहाता चित्रपटगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा फलक लागणार का? याची चिंता आता चालकांसह निर्मात्यांना भेडसावू लागली आहे.
कोट
चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट पाहायलाच हवेत, असं आता काही राहिलेलं नाही. उलट ‘ओटीटी’मुळे मनोरंजनाचे जग अधिक जवळ आले आहे. मोबाईलच्या प्लॅनमध्ये वेगवेगळे चित्रपट किंवा सिरीज आता सहजपणे घरबसल्या बघता येणे शक्य झाले आहे.
- अमेय चरणकर,अभियंता
कोट
महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू होतील की नाही याबाबतचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी अजूनही राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत. सरकारचे आदेश आले की, आम्ही त्वरित चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने कसे सुरू करता येतील हे पाहणार आहोत.
- प्रकाश चाफळकर, सचिव, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया