विशाल शिर्के, पुणेकाही वर्षांपासून पुण्यात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे, त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुण्याची ओळख आता ‘वाहतूककोंडीचे शहर’ अशी होत आहे. वाहतूक कोंडीतून पुढे जाण्याची प्रत्येकालाच घाई असल्याचे चित्र रस्त्यावर पाहायला मिळत आहे. त्यातूनच सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंगचे नियम न पाळणे, मोटार चालविताना सिट बेल्ट न लावणे, लेन कटिंग, पादचाऱ्यांच्या सिग्नलकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे असे प्रकार वाहनचालकांच्या अंगवळणी पडत असल्याचे दिसते. वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल सोळा लाख वाहनचालकांकडून गेल्या चार वर्षांत तब्बल अठरा कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केल्यास कारवाई करण्याची घोषणा वाहतूक पोलिसांनी केली आहे. तसेच झेब्रा क्रॉसिंगचा नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांकडे हेल्मेट, वाहन परवाना, कागदपत्रे, लेन कटिंग, सिग्नल तोडणे, रॅश ड्रायव्हिंग अशा प्रकारच्या नियमभंगाचा दंड वसूल करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाने गेल्या चार वर्षांत तब्बल ७१ विविध प्रकरणांत वाहनचालकांकडून दंड वसूल केला आहे. यातून पोलीस व सरकारी वाहनेही सुटू शकलेली नाहीत. शहरात या काळात १५ लाख ७३ हजार ७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक प्रकरणे ‘नो पार्किंग’मध्ये वाहन लावणे व सिग्नल तोडणाऱ्यांची आहेत. यात नो-पार्किंगमध्ये वाहन लावल्याप्रकरणी २ लाख ७० हजार २५१ व सिग्नल तोडल्याप्रकरणी ४ लाख ६३ हजार २४५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे. रिक्षातून प्रमाणापेक्षा अधिक मुलांची वाहतूक करणे, बस रॅपिड ट्रान्झिस्टमधून (बीआरटी) वाहने दामटणे, चुकीच्या दिशेने वाहने चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, पदपथावर वाहन पार्क करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मोटारीला काळ््या काचा लावणे, नो एन्ट्री असताना वाहन पुढे घेऊन जाणे, रहदारीस अडथळा करणे या प्रकरणीही कारवाई करण्याचे प्रमाण मोठे आहे.
बेशिस्तीमुळे कोटींची उड्डाणे !
By admin | Updated: December 15, 2014 01:47 IST