अभियांत्रिकी प्रवेशापूर्वी क्षमता तपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:01+5:302021-04-15T04:09:01+5:30

मुळात अभियांत्रिकी म्हणजे काय? हे प्रथमतः समजून घेतले पाहिजे. विज्ञानाचे नियम, मूलभूत ज्ञानाचा अभ्यास करून त्यायोगे विविध उपकरणे, ॲप्लिकेशन ...

Check capacity before engineering admission | अभियांत्रिकी प्रवेशापूर्वी क्षमता तपासा

अभियांत्रिकी प्रवेशापूर्वी क्षमता तपासा

Next

मुळात अभियांत्रिकी म्हणजे काय? हे प्रथमतः समजून घेतले पाहिजे. विज्ञानाचे नियम, मूलभूत ज्ञानाचा अभ्यास करून त्यायोगे विविध उपकरणे, ॲप्लिकेशन तंत्रज्ञान विकसित करणे अभियांत्रिकी क्षेत्रात गरजेचे आहे. त्यासाठी बारावीपर्यंतचा असलेला पक्का पाया, चिकाटी, कष्टाची तयारी, अभ्यासक्रमाबाहेरचे शिकून घेण्याची मानसिकता विद्यार्थ्यांकडे हवी. सुरुवातीला हुशार समजला जाणारा एक विशिष्ट विद्यार्थीवर्गच अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा. अभियांत्रिकीचे शिक्षण आणि त्यासाठी लागणारी कुवत विद्यार्थ्यांकडे होती. त्यामुळे पदवी मिळताच त्यांना मनासारखी नोकरीही मिळत होती. त्या काळातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे मोठमोठे व्यवसाय सुद्धा उभे केले.

सर्वांनाच तंत्रज्ञानाचे शिक्षण या नावाखाली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि शासन यांच्या धोरणामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली. विविध शाखांची प्रवेशक्षमता वाढली. परंत, दुर्देेैवाने प्रवेशाचे निकष शिथिल झाले. त्यामुळे कुणालाही अभियांत्रिकीला प्रवेश घेणे सोपे झाले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी मूलभूत ज्ञान (बारावीपर्यंतचे), चिकाटी, कष्ट करण्याची तयारी लागते. परंतु, अभियांत्रिकी प्रवेशाचे निकष कमी केल्याने आणि प्रवेशक्षमता वाढल्याने ज्याची कुवत नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळणे सुलभ झाले. परंतु, त्यामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र, ज्ञानवंत विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. तसेच कमीत कमी कष्टात उतीर्ण होण्याची वृत्ती वाढली.

केवळ उत्तीर्ण होणे, ४० ते ५० टक्के गुण मिळविणे, असे अंतिम ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. त्यामुळे अभियांत्रिकीच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचला. मात्र, अभियांत्रिकीचे सर्वच विद्यार्थी असा विचार करत नाहीत. बरेचशे विद्यार्थी बारावीला कमी गुण असूनही, अभियांत्रिकी परीक्षेत चांगले गुण, ज्ञान मिळवून चांगल्या नोकरीला लागल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी चार वर्षांत अभ्यासाबरोबरच स्वत:लाही विकसित केले. आवश्यक प्रशिक्षण घेऊन ज्ञान आत्मसात करून चांगल्या पदावर पोहचले. मात्र, दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे.

औद्योगिक क्षेत्रातही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मागणी असते. परंतु, कामचुकारपणा, बेशिस्त आदी गोष्टींमुळे वर्षभरातच नोकरी गमवावी लागणारे विद्यार्थीही भरपूर आहेत. पदवी मिळाली पण नोकरी नाही? त्यामुळे ज्यांची परिस्थिती चांगली आहे, असे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात. हे नाही? जमले म्हणून ते’ अशा वृत्तीमुळे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारी टक्केवारी सुद्धा कमी झाली आहे. काही विद्यार्थी बँकिंग किंवा मार्केटिंगमध्ये नोकरी पत्करतात. राहिलेला वर्ग शेवटी कॉल सेंटरची नोकरी स्वीकारतो. हे कटू सत्य आहे. हे सर्व टाळण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पालक, शासन आणि शिक्षण संस्थांनी विशेष अभ्यास करणे आवश्यक आहे.

आपल्या मुलाला दहावीला ९० टक्के आहेत किंवा माझे स्वप्न आहे म्हणून अभियांत्रिकीला प्रवेश घे, असे करण्यापेक्षा प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची क्षमता जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच्या आवडीचा विचार करूनच त्याचा प्रवेश निश्चित केला पाहिजे. त्यामुळे अभियांत्रिकीची विशेष आवड असणारे विद्यार्थीच प्रवेश घेतील, आनंदाने शिकतील आणि या सगळ्याचा परिणाम निकाल आणि त्यांना लागणाऱ्या नोकऱ्यांवर होइल. आवड असलेले विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देतील.

महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि प्लेसमेंटसाठी प्रयत्नशील असतात. कारण प्लेसमेंट वाढले तर प्रवेश वाढतील, अशी सोपी धारणा त्यासाठी असते. दुर्दैवाने अभियांत्रिकीची आवड नसणारे, आईवडिलांची इच्छा म्हणून प्रवेश घेणारे किंवा शॉर्टकट घेऊन यशस्वी होता येईल, असा ॲटिट्यूड असणारे विद्यार्थी कोणत्याही प्रशिक्षणास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये नोकरीसाठी लागणारे कौशल्य विकसित होत नाही. त्याचा परिणाम मिळणाऱ्या नोकरीवर होतो. या विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतले, प्रशिक्षण घेतले व विविध कौशल्य विकसित केले ते सर्व चांगल्या पदावर काम करत आहे. परंतु, जे विद्यार्थी केवळ टाइमपास म्हणून किंवा केवळ प्रमाणपत्रासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात उपस्थिती दर्शवतात. असे विद्यार्थी चांगल्या नोकरीचे निकष पूर्ण करू शकत नाही. मग शेवटी पर्याय म्हणून त्यांना मार्केटिंगचा किंवा वर्क सेंटरच्या ठिकाणी नोकरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी दहावी-बारावीच्या गुणांच्या मागे धावणे कमी करून प्रत्यक्ष शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात आणि विद्यार्थी व पालकांच्या मानसिकतेत बदल करून गुणवंत विद्यार्थी घडवले तरच प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी नोकरी आणि व्यवसाय करणे शक्य होईल.

- गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Check capacity before engineering admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.