चाकण : पोलीस ठाण्याची पायरी चढायची म्हटले की, सर्वसामान्य जनतेच्या मनात धडकीच भरते. काही होवो पण पोलीस ठाणे आणि कोर्टकचेरी नको, अशी उक्तीच प्रचलित आहे. परंतु चाकण पोलीस स्टेशन सामान्य माणसासाठी अधिक सोयीचे आणि आणि देखणे करण्याचा प्रयत्न येथील पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.
' स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा ' या नागरी अभियानांतर्गत जनाजागृती सुरु असताना पोलीस विभागांतर्गत स्मार्ट पोलीस नामांकावर पोलीस स्टेशन स्वच्छ व सुंदर करण्यासाठी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी मेहनत घेतल्याने चाकण पोलीस ठाण्याचे रूपडे पालटले आहे.
चाकण पोलीस स्टेशनमध्ये आता नागरिकांना अधिक सोयीची ठरेल अशी कार्यशैली आणि संपूर्ण पोलीस ठाणे रंगरंगोटी, फलक, नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गार्डन आणि त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या पोलीस स्टेशन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत अभिलेख, नागरिकांची सनद, नागरिकांसाठी सूचना पेटी, निर्भय वातावरण, पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपुलकीची वागणूक अशा सूक्ष्म बाबींवर लक्ष देण्यात आले आहे.
चाकण पोलीस ठाण्याच्या सर्व विभागांतील कागदपत्रांची जागा आता सॉफ्ट कॉपीने घेतली आहे. त्यामुळे कामकाजही गतिमान होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस यांची येथून बदली झालेली आहे, मात्र नूतन अधिकारी आलेले नसल्याने त्यांना पदभार सोडता आलेला नाही, अशा कालावधीत त्यांनी चाकण पोलीस ठाण्याचे अंतर्बाह्य रुपडे बदलले आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे बदलले रुपडे;