लोणी काळभोर : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या चैतन्य गवळी या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले. आतापर्यंत एकूण बारा जणांना अटक करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रिणीशी असलेले संबंध तोडावेत, असे सांगूनही न ऐकल्याने चैतन्य ज्ञानदेव गवळी (वय १८, रा. चंदनवाडी, ता. दौंड) याचा २८ फेब्रुवारी रोजी कोयता व गुप्तीसारख्या हत्याराने निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. आज ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन या प्रकरणात अटक करण्यात आलेला बारावा आरोपी आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय गिरमकर व रॉकी देवकाते यांना हा अल्पवयीन मुलगा मावळ तालुक्यात असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून मावळ तालुक्यात शोधमोहीम चालू केली होती. त्या मोहिमेला आज यश मिळाले आहे. (वार्ताहर)
चैैतन्य खून प्रकरण; आणखी एक अटकेत
By admin | Updated: March 16, 2015 04:16 IST