लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: केंद्रीय अंदाजपत्रकात मेट्रोसाठी राज्यातील नाशिक व नागपूर या दोन शहरांना महत्व देण्यात आले आहे. पुणे मेट्रोचा पिंपरी-चिंचवड ते निगडी हा विस्तारीत मार्ग केंद्र सरकारकडे, तर स्वारगेट ते कात्रज हा राज्य सरकारकडे मंजुरीच्या स्तरावर रखडला आहे. त्याची गरज असताना केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.
मागील ५ वर्षांपासून केंद्रीय अंदाजपत्रकात मेट्रोसाठी नागपूर शहराला महत्व दिले जात आहे. यंदाही नागपूरला फेज २ म्हणजे विस्तारित मार्गासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. पुण्याला मात्र दोन्ही विस्तारित मार्गांसाठी ठेंगा दाखवला जात आहे. नाशिकची मेट्रो अद्याप कागदावरच आहे. तिथे निओ मेट्रो हा प्रकल्प राबवला जात असून त्याला केंद्र सरकारने त्वरित मंजुरी तर दिली आहेच, शिवाय यंदाच्या अंदाजपत्रकात लगेच तब्बल २ हजार ९८ कोटी रुपयांची तरतूदही करून दिली आहे. पुण्याचे स्वारगेट ते कात्रज व पिंपरी- चिंचवड ते निगडी हे दोन मार्ग मात्र मंजुरीच्या स्तरावरच ठेवण्यात आले आहेत.
पुणे मेट्रोचे काम सुरू होऊन ४ वर्षे झाली आहेत. तरीही अजून एकही मार्ग व्यावसायिकपणे सुरू झालेला नाही. सध्याच्या मार्गाला जोडूनच असलेल्या स्वारगेट ते कात्रज, पिंपरी-चिंचवड ते निगडी या विस्तारीत मार्गाची आग्रही मागणी आहे. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यासाठी निधी प्राप्त होईल, अशी महामेट्रो कंपनीचीही अपेक्षा होती, मात्र ती पूर्ण झाली नाही.
महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पुणे मेट्रोसाठी २ हजार ४६१ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र त्याबाबत अंदाजपत्रकात काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. अंदाजपत्रकातून दर वर्षी मिळणारी तरतूद पुणे मेट्रोला सध्याच्या कामासाठी मिळेलच, मात्र सध्याच्या मार्गासाठी किंवा विस्तारित मार्गासाठी कोणतीही विशेष तरतुद केंद्रीय अंदाजपत्रकात नाही.
कामाच्या चौथ्या वर्षापासून केंद्र सरकार जास्तीची रक्कम द्यायला सुरुवात करते. कारण त्यावेळी सर्वाधिक खर्चिक असलेले तांत्रिक काम सुरू झालेले असते. त्यात मेट्रोच्या डब्यांपासून ते सिग्नलिंगपर्यंतच्या कामाचा समावेश असतो. त्यामुळे पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात पुणे मेट्रोसाठी तसेच विस्तारीत मार्गासाठीही विशेष तरतूद नक्की असेल, असा विश्वास महामेट्रोच्या कार्यालयातून व्यक्त करण्यात आला.