लक्ष्मण मोरे, पुणेविविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) तपास करण्याच्या नावाखाली मिळवून काही पोलीस अधिकारी स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून चालविली जाणारी ही लूटमार रोखण्यासाठी सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईल कंपन्यांकडून मिळवलेल्या सीडीआरचा अहवाल मागवला आहे. गुन्हेगार, घरफोडे, चोरटे, सोनसाखळी चोरटे, फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मोबाईल वापराची सविस्तर माहिती पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी मोबाईल कंपन्यांकडून घेण्याची मुभा आहे. पोलीस ठाणी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हेगारांच्या मोबाईलचे सीडीआर नेहमी मागवत असतात. त्याच्याआधारे गुन्हेगारांचे कोणाकोणाशी बोलणे होते, त्यांच्या संपर्कात कोण कोण आहेत, याची माहिती मिळते. काही अधिकारी प्रामाणिकपणे सीडीआरचा वापर करून गुन्ह्यांचा तपास करतात. यासोबतच गुन्हेगारांसह काही संशयित, ‘विशेष’ व्यक्तींचे मोबाईल आयुक्तालयामध्ये ‘इंटरसेप्शन’ला लावले जातात. या सर्वांचे संभाषण संशयास्पद वाटल्यास पोलीस कारवाईही करतात. परंतु काही अधिकारी मात्र या सीडीआरचा वापर करून स्वत:चे खिसे गरम करण्याचे काम करीत आहेत. गुन्हेगार अथवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना लुबाडण्याचेही प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)गुन्हे उघडकीस आणण्यास मदतमोबाईल सीडीआरचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सध्या तरी मानवी खबऱ्यांपेक्षा पोलिसांची भिस्त मोबाईल कॉल डिटेल्सवरच आहे. परंतु यामध्येही काही ‘पॉवरबाज’ अधिकाऱ्यांचीच सध्या चलती आहे. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने तर तत्कालीन क्रमांक दोनच्या अतिवरिष्ठाच्या मोबाईलचेच सीडीआर काढल्याची चर्चा आयुक्तालयामध्ये आहे. नीलेश घायवळ टोळीच्या अमोल बधेचा खून करून गजा मारणे पसार झाल्यानंतरची ही घटना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निम्नस्तरीय अधिकारी सीडीआरच्या माध्यमातून लक्ष ठेवून असल्याचे समोर आले आहे.पोलीस ठाण्यांना अगर गुन्हे शाखेच्या पथकांना कोणाचा सीडीआर हवा असेल तर त्यासाठी टेक्निकल अॅनालिसीस विंग किंवा संबंधित विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले जाते. नोडल आॅफिसरमार्फत हा सीडीआर पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला दिला जातो.
‘सीडीआर’ लूटमारीला बसणार चाप
By admin | Updated: July 6, 2015 05:38 IST