देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज 330 व्या पालखी सोहळ्याच्या तयारीची माहिती घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार किरण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक झाली. रस्त्यातील राडारोडा त्वरित उचलून घेण्यास सांगावे अन्यथा त्यांना दंड आकारावा, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी नदीच्या घाटावर जीवरक्षक नेमावेत, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून घ्यावेत, अग्निशामक दलाच्या गाड्यांना सोहळ्यासाठी पत्रव्यवहार करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या बैठकीत संस्थानासह ग्रामपंचायत कार्यालय, महसूल विभाग, पाणीपुरवठा, विद्युत, पीएमपी, पोलीस,पाटबंधारे,पंचायत समिती, आरोग्य विभागाची तयारी अंतिम टप्प्यात असून, पाणीपुरवठा, टॅँकर, फिरते शौचालय, वाहतूक नियंत्रण, विद्युतपुरवठा याबाबत असणाऱ्या त्रुटी काढून वारकऱ्यांना जास्तीत जास्त सोईसुविधा सेवाभावी वृत्तीने काम करून पुरविण्याबाबत आवाहन काकडे यांनी उपस्थितांना केले. या सभेत महसूल विभागाच्या वतीने रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये गायरान जमीन व इतर शासकीय जागेवर ३३० व्या पालखी सोहळ्यानिमित्त ३३० झाडे लावून त्यांना वाढविण्याचा संकल्प केला आहे. प्रस्थानाच्या दुसऱ्या दिवशी ९ जुलैला शासकीय पूजा संपल्यानंतर हा वृक्षारोपण करणार असल्याची माहिती काकडे यांनी दिली.या बैठकीला सरपंच कांतिलाल काळोखे, संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख सुनीलमहाराज मोरे, माजी विश्वस्त नितीनमहाराज मोरे, पोलीस उपनिरीक्षक लालासाहेब गव्हाणे, विद्युत मंडलाचे उपअभियंता राजेश गुजर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश जाधव, पीएमपीचे व्यवस्थापक गुलाब परदेशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. डी. सी. बोरा, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अ. ना. गोसावी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे डी.के. आरकडे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, ग्रामपंचायत सदस्य लीला काळोखे, प्रकाश हगवणे, सुनीता टिळेकर, शैला खंडागळे, आनंदा काळोखे, रत्नमाला करंडे,ज्योती चव्हाण, मंडल अधिकारी चंद्रकांत पाटील, तलाठी मिलिंद मनवर, सचिन मोरे आदी उपस्थित होते. गुडसूरकर यांनी माहिती दिली की, ग्रामपंचायतीची दोन्ही फिरती शौचालये निकामी झालेले असून, त्यांची दुरुस्ती करून मिळावी अथवा दुरुस्तीस परवानगी द्यावी. इतर ठिकाणची फिरती शौचालये उपलब्ध करून द्यावीत, पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात येतील. गावातील रस्त्यांवर पडलेले साहित्य संबंधितांनी हटविले नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे काकडे यांनी सांगितले. कनिष्ठ अभियंता सतीश केदार यांनी यात्राकाळात वीज खंडित होणार नाही याबाबत काळजी घेऊ, २४ तास विद्युत कर्मचारी उपलब्ध असतील, या शिवाय इंद्रायणी नदीवरील येलवाडीकडे गेलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत नियोजन सुरू असून, तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. पालखी मार्गावरील विजेचे खांब पुढील आठवड्यात काढून टाकण्यात येतील. दिंडीकरी व फडकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरते वीजजोड देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पी. के. जाधव यांनी २४ तास पाणीपुरवठा, क्लोरिन शुद्धीकरणासह पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले. टीसीएल पावडरचा साठा करण्यात आला आहे. जन्मस्थानाजवळ नळकोंडाळी काढण्याची मागणी करून तेथे वारकऱ्यांची सोय करण्याचे सांगितले. पाटबंधारे विभागाने देखील पालखी पूर्वी वेळेत पाणी मागणीप्रमाणे सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. गरजेनुसार ६ ते ९ जुलै या दरम्यान देहू-आळंदीसाठी ११, निगडी देहूसाठी ६, पुणे ते देहूसाठी ४ जादा बसची व्यवस्था करण्यात येईल, पीएमपीचे परदेशी यांनी सांगितले.(वार्ताहर)
नदीघाटावर सीसीटीव्ही, जीवरक्षकाबाबत सूचना
By admin | Updated: June 18, 2015 23:41 IST