पुणे : पोलीस ठाण्यांत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याकरिता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये तसेच महत्त्वाच्या भागात सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनेक पोलीस ठाण्यांनी सीसी टीव्ही बसवायला सुरुवातही केली आहे; परंतु अद्याप ज्या पोलीस ठाण्यांनी ही प्रक्रिया सुरू केलेली नाही, त्यांच्याकडून पोलीस आयुक्तालयाने माहिती मागवली आहे.उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत सीसी टीव्ही बसविण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात तसेच महत्त्वाच्या भागांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. पुणे पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांनी आवारात तसेच बाहेरच्या बाजूला सीसी टीव्ही कॅमेरे व रोटेटिंग कॅमेरे बसविले आहेत. या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कक्षामध्ये देण्यात आलेले आहे; परंतु अद्यापही बऱ्याचशा पोलीस ठाण्यांमध्ये सीसी टीव्ही बसलेले नाहीत.पोलीस ठाण्याचे आवार, व्हरांडा, महत्त्वाच्या खोल्या व विशेषत: गुन्हेगारांचे लॉकअप रूममध्ये सीसी टीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. अनेकदा पोलीस ठाण्यांच्या आवारात लाचखोरीची प्रकरणे घडतात. तक्रार द्यायला गेलेल्या सर्वसामान्यांना पोलिसांकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही. सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा ‘वॉच’ असल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्यात मदत होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून सीसी टीव्ही बसविण्यासाठीची माहिती पोलीस आयुक्तालयाने पोलीस ठाण्यांकडून मागवली आहे. ही माहिती शासनाला सादर करून तसा निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही
By admin | Updated: November 6, 2014 23:37 IST