पुणे : एटीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका तरुणीच्या खात्यातून अडीच हजार रुपये लांबविले. ही घटना कोंढवा भागात घडली.
याबाबत रविवार पेठेत राहणा-या एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि.२६ ) ती कामानिमित्त कोंढवा भागात आली होती. तेथील इंद्रायू मॉल परिसरातील एका बँकेच्या एटीएम केंद्रात दुपारी चारच्या सुमारास ती गेली असता तिच्या पाठोपाठ दोन चोरटे एटीएम केंद्रात शिरले. चोरट्यांनी एटीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीकडून तिच्याकडील डेबिट कार्ड घेतले आणि पैसे काढून देतो, अशी बतावणी केली. हातचलाखीने त्यांनी तरुणीचे डेबिट कार्ड चोरले आणि चोरट्यांनी तिला दुसरे डेबिट कार्ड दिले. गडबडीत तरुणीच्या निदर्शनास हा प्रकार आला नाही. त्यानंतर तरुणी एटीएम केंद्रातून पैसे न काढता बाहेर पडली. दरम्यान, चोरट्यांनी डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दाचा गैरवापर करून तिच्या खात्यातून अडीच हजारांची रोकड लांबिवली. काही वेळानंतर खात्यातून अडीच हजारांची रोकड काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.
---