पिंपरी : चिंचवड येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्ती रद्द केल्याचा आदेश दाखविला होता. मात्र, हा आदेश महापालिका प्रशासनास मिळालेला नव्हता. निवडणुकीनंतर हा आदेश महापालिकेस मिळाला असून, त्यामुळे शहरातील ३२ हजार मिळकतींची शास्ती रद्द होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांची शास्ती रद्द केल्याचा आदेश काढला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे तो महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे हा आदेश बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांनी केला होता. महापालिका निवडणूक संपल्यानंतर हा आदेश महापालिका प्रशासनास मिळालेला आहे. अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याची तरतूद होती. त्यामुळे शास्ती रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली होती. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबतचा आदेश माध्यमांना दिला होता. त्या आदेशावरून महापालिकेच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर चिंचवड येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांना ‘मी हा आदेश घेऊन आलो आहे’ असा खुलासा जाहीरपणे करावा लागला होता. त्यानंतरही हा आदेश फसवा असल्याची टीका होत होती. महापालिका निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरही आदेश महापालिकेत मिळाला नसल्याची तक्रार केली होती. (प्रतिनिधी)
शास्ती रद्द; ३२ हजार मिळकतींना फायदा
By admin | Updated: March 16, 2017 01:51 IST