पुणे : कोरोनाच्या काळात अँटिबॉडी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अगदी परवलीचा शब्द झाला आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यावर आणि लसीकरण झाल्यावर आपल्या शरीरात अँटिबॉडी किती प्रमाणात विकसित झाल्या आहेत, याबाबत सामान्यांना कुतूहल असते. याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन महिन्यांमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये अँटिबॉडी चाचण्यांमध्ये २५-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मार्च महिन्यापासून सामान्य नागरिकांना लसीकरण खुले झाले. लसीचा डोस घेतल्यानंतर, १४ दिवसांनी शरीरात अँटिबॉडी विकसित होण्यास सुरुवात होते. रोग प्रतिकारकशक्ती निर्माण होते आहे का, याची पडताळणी करण्यासाठी लसवंत झाल्यावर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये ही चाचणी करण्यासाठी अनेक नागरिकांकडून चौकशी केली जात आहे. चौकशी करणाऱ्यांपैकी ९०-९५ टक्के लोक चाचणी करून घ्यायला आवर्जून येतात, असे निरीक्षण खासगी प्रयोगशाळांनी नोंदवले आहे.
पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले, ''लसीचा डोस घेतल्यानंतर, रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटिबॉडीज तयार करतात. मानवी शरीरातील या अँटिबॉडी कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर शरीरात अँटिबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत हे पाहण्यासाठी अनेक लोक सध्या प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेण्यासाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये हजेरी लावत आहेत. अँटिबॉडी चाचणी करण्यासाठी व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीत ज्यांच्या रक्तात कोविड-१९ विषाणूला विरोध करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे, अशांची ही चाचणी पॉझिटिव्ह येते.''
------
कोरोना लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर, अनेक जण शरीरात किती अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. जेणेकरून आपल्याला कोरोना विषाणूशी लढता येईल, हे तपासून पाहण्यासाठी प्रोटिन अँटिबॉडी चाचणी करून घेत आहेत. परंतु, लस घेतल्यानंतर अँटिबॉडी चाचणीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ला न घेता स्वतः ठरवून ही चाचणी करू नये. गरज असल्यास डॉक्टरांनी सांगितल्यावरच ही चाचणी करून घ्यावी.
- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन
--------
कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते आणि अँटिबॉडीपासून नेमके किती दिवस संरक्षण मिळते, याबद्दल अद्याप अभ्यास सुरू आहे. अँटिबॉडी तीन ते सहा महिने टिकतात, असा अंदाज बांधण्यात आला आहे. कोरोना किती तीव्र स्वरूपाचा होता, यावर अँटिबॉडीचे प्रमाण अवलंबून असते. काहींमध्ये प्रमाण अतिशय कमी, तर काहींमध्ये पुरेसे असते. अँटिबीडी टेस्टमधून हे प्रमाण कळते. चाचण्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. प्रकारानुसार प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे दर ठरलेले असतात. हे दर ३००-८०० रुपयादरम्यान असू शकतात.
- डॉ. मिहीर कुलकर्णी, जनरल फिजिशियन