श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील बैलांचे व्यापारी पोपट तुकाराम खिरड हे आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी कोणाला काही न सांगता ते घराबाहेर पडले. वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत असलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा येथील काठावर त्यांची कपडे, दुचाकी व चष्मा मिळून आला होता. त्यामुळे खिरड यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधला जात होता. तरुणांनी मागील तीन दिवसांपासून नदीपात्रात त्यांचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळाला आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी अक्षय खिरड यांनी मंचर पोलिसात माहिती दिली आहे. वडगाव काशिंबेग गावच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात पोपट खिरड यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोबत: पोपट खिरड फोटो