मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर गायमुख फाटा येथे रस्त्यावर धोकादायकरीतीने आलेल्या बाभळीच्या फांदीचा फटका एसटीच्या काचेला बसून ती फुटली. सुदैवाने चालकाने बस नियंत्रित केल्याने मोठा अपघात टळला. या घटनेने प्रवासी प्रचंड घाबरले होते. एसटीचालकाने मंचर पोलीस ठाण्याला ही घटना कळविली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोरवाडी गावच्या पुढे गायमुख फाटा येथे बाभळीच्या झाडाची एक फांदी धोकादायकरीत्या रस्त्यावर आली होती. अनेक वाहने या फांदीला घासून गेली होती. वेगातील वाहनाला फांदी अडकून ती वेगाने मागे येत होती. अशा प्रकारे दिवसभर अनेक वाहनांना तसेच दुचाकींना या फांदीचा तडाखा बसला होता. सुदैवाने त्या वेळी दुर्घटना घडली नाही. मुंबई आगाराची नारायणगाव-मुंबई ही बस मंचर बसस्थानकावर थांबून नंतर पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान, एसटीचालकानेया घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली. तसा तक्रार अर्ज त्यांनी दिला. पोलिसांनी त्याची नोंद घेतली आहे. आज दिवसभर ही धोकादायक फांदी वाहनांना त्रासदायक ठरत असूनही तोडली जात नव्हती. वाहनांना घासून गेल्यावर फांदीचा पाला पडून तो दुचाकीचालकांच्या डोळ्यात जात होता. सायंकाळी धोकादायक फांदी तोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. (वार्ताहर)
फांदीच्या फटक्याने काच फुटली
By admin | Updated: January 12, 2017 01:48 IST