पुणे : कोरोनामुळे सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणातील अडचणी लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) विद्यार्थ्यांसाठी काही ब्रीज कोर्स तयार केले असून येत्या आठवड्याभरात सर्व शाळांनापर्यंत हे कोर्सेस पोहोचविले जाणार आहेत. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे, असे एससीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या असल्या, तरी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम शिकवण्यापूर्वी त्यांची मागील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या घटकांची उजळणी घेतली जाणार आहे. एससीईआरटीने याबाबतचा आराखडा तयार केला आहे. लवकरच या आराखड्याचे उद्घाटन केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना हे ब्रीज कोर्सेस कसे शिकवावेत यासंदर्भात सर्व शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना आधीच्या इयत्तेतील कोणता अभ्यासक्रम शिकवणे आवश्यक आहे. कोणत्या पाठांची उजळणी प्रामुख्याने घ्यावी लागेल. शिक्षकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करावे, पालकांनी पाठ्यपुस्तकावरील कोणत्या घटकांची उजळणी मुलांकडून करून घ्यावी, ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना अभ्यासक्रम कितपत कळला याची चाचपणी पालकांनी कशी करावी, याबाबतचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
-------------
सह्याद्री वाहिनीवर ऑनलाईन शैक्षणिक कार्यक्रम
कोरोनामुळे प्रत्यक्षात शाळांमध्ये उपस्थित राहून अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदा सह्याद्री वाहिनीवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या तासिका वाढविल्या आहेत. सध्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच तासांचा कालावधी घेण्यात आला आहे. लवकरच इतर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर ऑनलाईन शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.