पुणे : आयुष्यात कधी कोणतं वळण कशा पद्धतीने येईल, याबाबत कोणीच सांगू शकत नाही. समीर भिडे यांना २०१७ साली अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या ‘ब्रेन हॅमेरेज’मुळे त्यांचे आयुष्य पूर्णत: बदलून गेलं. मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या अनुभवामुळे इतरांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी ‘वन फाईन डे’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ८ डिसेंबर रोजी ऑनलाईन होणार आहे.
पुण्यात जन्मलेले समीर भिडे १९९० मध्ये पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना ३१ जानेवारी २०१७ मध्ये त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाले. हॅमरेज झाल्यानंतर भिडे जवळपास १ महिना कोमामध्ये होते. ‘सेरेबेलम व्हॅस्क्युलर अबनॉर्मेलिटी’मुळे त्यांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजारपणामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या घटनेवर त्यांनी ‘वन फाईन डे’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. सध्या भिडे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.