एका पुस्तकाने बदलली आयुष्याची दिशा :यूपीएससी पार केलेल्या भुवनेशची कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:26 PM2018-04-27T23:26:08+5:302018-04-27T23:26:08+5:30
स्पर्धा परीक्षेची लाखो मुलं तयारी करत असताना त्यात यश मात्र काही मोजक्यांचं मिळत. यातल्या एकाची ही गोष्ट. एका पुस्तकामुळे देशाला अधिकारी मिळाला आहे.
पुणे :एका पुस्तकाने आयुष्याची दिशा बदलू शकते का या प्रश्नाचे उत्तर आहे 'हो'.आईने दिलेल्या एका पुस्तकामुळे यूपीएससी परीक्षेत देशात ५९व्या आलेल्या भुवनेश पाटील याचे आयुष्याची दिशा बदलली.निकाल लागला तेव्हा भुवनेश पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर भावाच्या लग्नाची खरेदी करत होता. त्यातच फोन बंद असल्याने त्याने व्हॉट्सऍप बघितले नव्हते. अचानक मित्राने फोन करून तू सिलेक्ट झाला आहेस सांगितलं आणि त्याचा विश्वासच बसेना. अनेकदा मित्राकडून खात्री करून मग घरच्यांना बातमी सांगितली आणि दुकानातच जल्लोष सुरु झाला. अखेर पाच वर्ष केलेल्या त्याच्या कष्टांचे चीज झाले.
भुवनेश सांगत होता, खर्दे पाथर्डे हे मूळ गाव असलेले पाटील कुटुंब सध्या शिरपूर येथे राहते. भुवनेशचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. आईला आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याने पुण्यातील एमआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल शाखेची अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याचे शिक्षण सुरु असताना त्याच्या आईने 'ताई, मी कलेक्टर व्हयनू' हे राजेश पाटील यांचे पुस्तक भेट दिले आणि सुरु झाला एक प्रवास. २०१३साली अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या त्याने तीन वेळा परीक्षा दिली तर चौथ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्याला चरित्रात्मक चित्रपट बघायला आवडतात तर कँडिड फोटोग्राफीची आवडते.
माझ्या यशात माझ्या आई वडील आणि भावाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाल्याचं तो आवर्जून सांगतो. तुला इंजिनिअरिंग करून इतकी वर्ष झाले आता जॉब कर असा आग्रह त्यांनी कधीच धरला नसल्याचेही तो म्हणाला. आयुष्यात केलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत. त्याच फळ कधी ना कधी मिळतंच.तिसऱ्या प्रयत्नात १२ मार्कांवरून रँक हुकला होता.मनात नाही म्हटलं तरी निराशा होतीच. १ जूनला निकाल लागल्यावर वाईट वाटले तरी ते बाजूला ठेवत १७ जूनला परत प्राथमिक परीक्षा दिली आणि आता पास झालो. हे सगळं अद्भुत वाटत आहे.आईला फोन करून बातमी सांगितल्यावर तिला काहीही सुचत नव्हते. तिच्या कातर झालेल्या आवाजात सारे काही अनुभवल्याचेही तो सांगत होता. ते पुस्तक तो आज लागलेला निकाल या साऱ्यात मोठा कालावधी गेला असला तरी त्याचा शेवट मनासारखा झाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.