शिरूर : अनैतिक संबंधांच्या संशयावरून अण्णापूर (ता. शिरूर) येथील एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून तीन ठिकाणी तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.सुनील छबू पवार (वय ३५, रा. अण्णापूर, ता. शिरूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सतीश छबू पवार यांनी फिर्याद दिली आहे. सुनील याचे मारुती कुरंदळे यांच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा राडा मनात धरून कुरंदळे यांनी अथवा त्यांच्या सांगण्यावरून दुसरे कोणीतरी सुनीलचा खून केल्याचा संशय फिर्यादी सतीश पवार यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. काल रात्री १० च्या सुमारास सुनील आपल्या दुचाकीवरून (एमएच १२-५५९६) कर्देलवाडी ते अण्णापूर कॅनॉलमार्गे अण्णापूरकडे येत असताना अण्णापूरचे गावाच्या हद्दीत सुनीलच्या डोक्यात शस्त्राने वार करण्यात आले. यात गंभीर जखमी झालेल्या सुनीलचा मृत्यू झाला. सुनीलचे बंधू सतीश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपास पथके रवाना केली आहेत. पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागदेखील समांतर तपास करीत आहेत.
अनैतिक संबंधांच्या संशयावरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 03:04 IST